Thursday, October 27, 2011

फोन मॅनर्स

आज सकाळी सासुबाईंनी फोन करण्‍यास एक नंबर डायल केला तर पलिकडून एका बाईचा आवाज ऐकू ला, त्‍यांच्‍या ओळखीचा वाटला नाही. त्‍यांनी विचारलं कोण बोलतंय?'  त्‍या बाईनी प्रतिप्रश्‍न केला 'आपण कुठून बोलताय' सासुबाई म्‍हणाल्‍या 'अमुक गावावरूनतर तिने म्‍हटले ''राँग नंबर'आणि फोन ठेऊन दिलामग त्‍यांनी नीट तपासून पुन्‍हा नंबर डायल केला आणि ज्‍या व्‍यक्‍तीशी संवाद साधायचा होता तिच्‍याशी बोलणं झालं. थोड्या वेळाने त्‍या राँग नंबरवरून एका पुरुषाचा फोन आला त्‍याने म्‍हटले ‘कशा आहात आपण?’ ‘काय म्‍हणतंय तुमचं श‍हर?’ आई म्‍हणाल्‍या – ‘ठीक आहे, सगळं मजेत आहे.’ मग त्‍याने दसर्‍याच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या आणि मग फोन आधीच्‍या बाईकडे दिला ती म्‍हणाली ‘क्षमा करा मी आपणास ओळखू शकले नाही. कशा आहात आपण वगैरे...............’
ह्या तिघांनी समोरच्‍याची ओळख विचारलीसुद्धा नाही आणि हे वरील मजेशीर संभाषण करून घेतले. हा एक प्रसंग हसण्‍यावारी नेता येईल, पण मी विचारात पडले जर आपण समोरच्‍याला ओळखू नाही शकलो तर त्‍याला ही गोष्‍ट सांगण्‍यात लाजायचं कशाला? जगात आपण कित्‍येक लोकांना भेटतो, प्रवासात, बाजारात, पब्लिक प्‍लेस, समारंभ इत्‍यादी. सर्वांचेच चेहरे, नाव आणि आवाज लक्षात राहतीलच हे शक्‍य नाही, ज्‍यांची स्‍मरणशक्‍ती अफाट असेल त्‍यांच सोडा पण सर्वसामान्‍य माणसासाठी प्रत्‍येकाचे चेहरे-नाव-आवाज लक्षात ठेवणे जरा कठिणच असते.
  एक अजून प्रसंग आठवला, माझे एक ओळखीचे आहेत जे केटरर्सचं काम करतात, त्‍यांना लोकं फोन करून असे ऑर्डर देतात – ‘अगं अमुक तमुक, माझा 2 किलो चिवडा आणि 3 किलो चकली किंवा ....... किती होतील? कधी घ्‍यायला येऊ?’ झालं बोलून.............
आता ही गोष्‍ट वेगळी की त्‍या वहिनींना आवाजावरून व्‍यक्‍ती ओळखता येते पण फोन करताना लोकांना कोडं घालायची खूप वाईट खोड असते. असंच एक प्रसंग आठवला, फोनच्‍या दुसर्‍या बाजुने आवाज आला ‘हॅलो, मी दिनेश बोलतोय, काय दादा कसे आहात?’ आता हा कोणता दिनेश? म्‍हणजे लेल्‍यांचा की ऑफिसचा की मागच्‍या आठवड्यात भेटला तो? फोनवर हॅलो बोलताच ‘आणखी काय म्‍हणता?’ वगैरे सर्रास बोलायला सुरुवात करतात, अगदी पहिल्‍यांदा फोन करणारेसुद्धा. फोन करताना मी हा, इथून बोलतोय वगैरे पद्धतच नसते, कुठे आग लागलेली नसते की तुम्‍हाला विहीर खणायला बोलावले नसते मग एक वाक्‍य बोलून सुरुवात करायला काय जाते? कित्‍येकदा आपल्‍याकडे एखाद्याचा नंबर सेव्‍ह असतो पण समोरच्‍याकडेही आपला नंबर सेव्‍ह असेलच हे कशावरून? असला किंवा नसला तरी ओळख देऊन बोलणे कधीही चांगले. अगदी घरच्‍यांनाही फोन केल्‍यावर ‘अगं आई! मी........बोलते’ किंवा नातेवाईकांना फोन करताना ‘नमस्‍कार रामभाऊ!  मी नागपूरवरून जनार्दन बोलतोय.’ आणि मग पुढचे संभाषण करावे.
आता हे कित्‍येकांना पटतं काय माहिती? कळेल पण वळणार नाही तरी ह्या लेखाने तुम्‍हाला विचार करण्‍यास भाग पाडले असेल तर मिळवलं.

No comments:

Post a Comment