Saturday, October 29, 2011

प्रवास

सध्‍या मनात खूप विरक्‍तीची भावना आलेली आहे. संसारात मन रमत नाही, नेटवर जास्‍त वेळ सर्फिंग जमत नाही, लगेच उदास वाटू लागतं, हे डिप्रेशनची लक्षणे वाटू शकतील. सर्व काही सोडून एकांतवासात निघून जावे असेच वाटते. अशा जागी जिथे एकही ओळखीची व्‍यक्‍ती नसेल, फोन नसेल, टी.व्‍ही. नसेल, कॉम्‍प्‍युटर-नेट काहीही नसेल. एखाद्या गुहेत शांत बसून राहायचे, पक्ष्‍यांची किलबिलाट नको, पानांचा आवाज नको, वार्‍याची झुलूक असली तरी आवाज न करता, कुठल्‍याही आवाजाचा Disturbance नकोच, तिथे फक्‍त मला स्‍वतःमध्‍ये राहायचं आहे. असं ऐकलं आहे की माणसाच्‍या आतच सगळी सृष्‍टी दडलेली आहे, ही बाह्य सृष्‍टी नाकारून आतल्‍या सृष्‍टीत प्रवेश करावेसे वाटते, ते काय गूढ आहे ते जाणून घ्‍यायचे आहे. इथले नाते-संबंध, भौतिक गोष्‍टींचा वीट आला आहे, आता कुठेतरी दूर पळून जावेसे वाटते. कधी कधी मनात एक weird कल्‍पना येते, माझा एक्सिडेंट झाला आणि स्‍मरणशक्‍तीच हरवली तर? हे जग माझ्यासाठी अनोळखी होईल पण एक समस्‍या उद्भवेल, असे झाले तर मी स्‍वतःला पण ओळखणार नाही आणि मग मला माझी या भौतिक शरीराची ओळख मिळविण्‍यासाठी धडपड करावी लागेल आणि सध्‍या जसा मला प्रवास करावासा वाटतोय तो राहूनच जाईल, स्‍वतःचं अस्तित्‍व माहिती नसताना माणसाची स्थिती किती केविलवाणी होत असेल? नको, नको, कोणावरही अशी परिस्थिती येऊ नको देऊ रे देवा!  मी आहे तेच उत्तम. अशी भौतिक ओळख माहिती असताना ‘स्‍व’ची ओळख करून घेण्‍याचा प्रवास हा अप्रतिम असणार ह्यात शंकाच नाही. बघू किती लवकर असा प्रवास घडतोय ते!!!

No comments:

Post a Comment